सोलापूर : भारतीय सैन्य दलाचे कंत्राटीकरण करून देश व युवा विरोधी अग्निपथ योजना लागू करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली होती. आंदोलनाची वेळ सकाळी 10 वाजताची होती. आंदोलनाला शहर अध्यक्ष माजी नगरसेवक इतर जेष्ठ नेते आणि बरेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने दहा ते साडे दहाच्या दरम्यान हजर झाले होते.
आमदार प्रणिती शिंदे या स्वतः आंदोलनाला उपस्थित असल्याने राहणार असल्याने कार्यकर्त्यांची मोठी गर्दी रेल्वेस्टेशन परिसरात झाली होती त्यातच कधी न येणारे कार्यकर्ते सुद्धा यावेळी दिसून आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याला सव्वा दहाला सर्व कार्यकर्ते बसले.
सुरुवातीला उन्हाचे काय वाटले नाही. कार्यकर्त्यांचे जोशात भाषणे झाली. काही हौशा कार्यकर्त्यांनी भाषण करून निघून गेले, काही जण खाली थांबून आंदोलनला आल्याचे दाखवत नंतर तिथून काढता पाय घेतला. अर्धा तास झाला तास झाला ताई काही आल्याचं नाहीत.
उन्हाचा मारा वाढला, डोक्यावर रुमाल आले, महिला कार्यकर्त्यांनी पदर आणि ओढणी घेतली. साडे अकरा वाजता काहींनी चौकातील हॉटेलमध्ये जाऊन पाणी पिणे पसंद केले. शेवटी तब्बल पावणे दोन तासानंतर आमदार प्रणिती शिंदे यांचे आगमन झाले आणि पुन्हा ताईंच्या समोर उन्हात कार्यकर्ते चटईवर विराजमान झाले.



















