सोलापूर : सोलापूर विकास मंचच्यावतीनं सोलापूर होटगीरोड विमानतळावरुन विमानसेवेच्या आग्रही मागणीसाठी रविवारपासून चक्री उपोषण सुरु करण्यात आले आहे. या चक्री उपोषणाचा बुधवारी चौथा दिवस होता. पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी उपोषण स्थळी येऊन आपल्या पाठिंब्याचे पत्र विकास मंचच्या केतन शहा यांच्या हाती दिले.
याप्रसंगी श्रीनिवास कोंडी, संगीता इंदापुरे, यशवंत इंदापुरे, प्रभाकर आरकल, श्रीराम दास, अशोक चिल्का, व्यंकटेश आकेन, विजयकुमार गुल्लापल्ली, मन्सूर गांधी यांची उपस्थिती होती. तसेच वंचित बहुजन आघाडीचे राजरत्न फडतरे यांनी आपल्या पक्षाचा पाठिंबा दिला.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना गोप म्हणाले, सोलापूर पेक्षा छोट्या छोट्या शहरात विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू न होण्यास लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा आरोप करत आमची मुले रोजगार व पेमेंट नसल्याने पुणे, मुंबई किंवा हैदराबादला जात आहेत, आता आम्ही आई वडील राहिलो आहे, आमचा तळतळाट घेऊ नका असा टाहो फोडला..
मन्सूर गांधी म्हणाले, सोलापूरचे विमानतळ हे खाजगी झाले आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री, खाजगी विमान, हेलिकॉप्टर असलेले उद्योगपती यांच्या सेवेसाठीच आहे का? सार्वजनिक विमानसेवा सुरू न झाल्यास यापुढील आंदोलन विमानतळावर करण्यात येईल असा इशारा दिला.


















