पंढरपूर, दि. 08 : – जिल्ह्यात मराठा कुणबी जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युध्दपातळीवर सुरु झाली असून जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती कक्षाची तर तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्यांची स्थापना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशान्वये करण्यात आलेली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक तहसिल कार्यालयात कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पंढरपूर तहसिल कार्यालयातील कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्षास भेट दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तहसिल कार्यालयातील अभिलेख कक्षाची पाहणी करुन अभिलेख कक्षा मध्ये स्वत: थांबून जन्म आणि मृत्यूच्या नोंदीचे रजिस्टर पाहिले. जन्ममृत्यू रजिस्टर पाहणी करत असताना त्यांनी आत्तापर्यंत सापडलेल्या सर्व नोंदींचा आढावा घेवून मुळ नोंदवही पाहिल्या. यावेळी तपासणीची पाहणी करत असताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः समिती कक्षाकडून राहून गेलेल्या मोडी लिपीतील कुणबी जातीच्या नोंदी शोधून कक्षाच्या निर्देशनास आणून दिल्या. व हे अभिलेखे व्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले.
त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये कुणबी मराठा जात पुरावे तपासणी कक्षामध्ये किती नागरिकांनी भेटी दिल्या व चौकशी केली याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पंढरपूर तहसील कार्यालयाने मराठा कुणबी जात पुरावे तपासणीचे कामकाज अत्यंत काटेकोरपणे करावे. कुणबी जातीचे नोंद असलेले एकही अभिलेख तपासणीतून सुटणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अशी सूचना त्यांनी समिती कक्षातील सर्व सदस्यांना केली.
यावेळी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, अपर तहसिलदार तुषर शिंदे, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पी.के. कोळी तसेच तालुकास्तरीय समिती कक्षाचे सर्व सदस्य व अन्य महसूल कर्मचारी उपस्थित होते.
**********