सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून सोलापूर जिल्हयातील बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्यायाचे प्रमाण वाढले आहे.अनेक संस्थाचालक शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना चौकशी समिती नेमुन,चौकशी समिती न नेमता,शाळेतून कामावरुन नियमबाहय सेवामुक्त करीत आहेत.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देयकात नांव घातले जात नाही.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन वाढीसह पदोन्नती दिल्या जात नाही.तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ,वरिष्ठ वेतनश्रेणी,निवडश्रेणी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत.
अनुकंपा तत्वावर शिपायांची भरती मान्यता,महाराष्ट्र शासन यांनी सुरु केलेली असतांना सोलापूर माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशा मान्यता देत नाहीत.त्यामुळे जिल्हयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आतोनात अन्याय होत आहे.हा अन्याय दूर व्हावा.यासंदर्भात शिक्षण उपसंचालक पुणे विभाग,पुणे 1 यांच्या कार्यालयात सहविचार सभा होवून ही त्यांची अंमलबजावणी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून होत नाही.
अशा अन्यायग्रस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.20 ऑक्टोबर 2022 रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु करीत असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.सदर निवेदन शिक्षणमंत्री,शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक,शिक्षण उपसंचालक यांनाही देण्यात आली आहे.
यावेळी महासंघाचे राज्यसरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड,राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे,बाळासाहेब डोळसे,जिल्हाअध्यक्ष प्रा युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर,सहसचिव डॉ.राजदत्त रासोलगीकर,उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष संग्राम कांबळे,विठ्ठल मोरे,दिव्यांग विभाग प्रमुख विजयकुमार लोंढे,आनंद कोरे, सिद्धेश्वर दुधाळ, कुलभूषण साळवे धनंजय कोकाटे,दत्तात्रय शिंदे आदी पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.



















