सोलापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेदचे प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दोन दिवसाचा रानभाजी महोत्सव सुरू आहे.
त्याचे उद्घाटन बुधवारी सकाळी नऊ वाजता सीईओ दिलीप स्वामी अतिरिक्त सीईओ संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, दक्षिण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ, उमेद अभियान जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे, अभियान व्यवस्थापक मीनाक्षी मडवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
दिलीप स्वामी म्हणाले, शहरी नागरिकांना रानभाज्यांची माहिती व्हावी त्याचप्रमाणे बचतगटांना उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध व्हावे या दुहेरी भूमिकेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रानभाज्या खायला मिळतात परंतु शहरी भागामध्ये या भाज्या क्वचितच मिळतात सोलापूरकरांना अतिशय चांगली संधी आहे या दोन दिवसात येऊन रानभाज्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले.
अभियान व्यवस्थापक चवरे यांनी सोलापूरकरांनी या महोत्सवात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
याठिकाणी तांदूळसा, पाथरी, चिगळ, आघाडा, घोळ, माट, कडवंची, कुंदराची भाजी, कुरडू, शेवग्याच्या शेंगा असे अनेक प्रकारच्या भाज्या उपलब्ध असून याच ठिकाणी चुलीवरच्या भाकरी सोबत भाज्या खाण्याची सोय सुद्धा करण्यात आली आहे.


















