सोलापूर (प्रतिनिधी) विजापूर रोड भागातील निसर्गरम्य परिसरात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण होण्यासाठी गेल्या सात आठ वर्षापासून संभाजी ब्रिगेड पाठपुरावा करीत आहे. दरम्यान मंगळवारी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अंगावर जलपर्णी वस्त्र परिधान करून व जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन आगळेवेगळे आंदोलन केले. लक्ष वेधण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन निषेध नोंदवण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण व संवर्धनासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठा निधी मंजूर झालेला असून जवळपास सहा कोटीचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झालेला आहे त्यातून छत्रपती संभाजी महाराज तलावाचे एक पर्यटन स्थळ म्हणून विकास होणे गरजेचे होते पण या ठिकाणी महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षमुळे गेल्या पाच सहा वर्षांपासून या तलावाचे जलपर्णी व गाळ काढण्याचे काम सुरू आहे मध्यंतरी सहा महिने जलपर्णी काढण्याचे काम एका ठेकेदाराकडून करून घेण्यात आले त्याला लाखो रुपये खर्च झालेला जनतेचा कर रुपी पैसा वाया जात आहे तलावातील जलपर्णीची समूह उच्चाटन झाले नाही हा तलाव आहे की ईडन गार्डनचे मैदान आहे असा प्रश्न या तलावाकडे पाहून पडतो.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, जिल्हा उपाध्यक्ष अमित जाधव, जिल्हा सचिव राहुल सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र माने, शहर उपाध्यक्ष सिताराम बाबर, आणि जलपर्णी घेऊन आंदोलन करणारे संभाजी ब्रिगेडचे शहर संघटक दत्ता जाधव, शहर संघटक श्रीकांत कोळी इत्यादी उपस्थित होते.



















