विमानसेवेवरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला असून सभासद शेतकऱ्यांनी श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या समर्थनार्थ विजापूर रोडवरील हत्तुर येथे रास्ता रोको आंदोलन करत लक्ष वेधले.
सोलापूर शहरातील होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सोलापूर विकासमंच गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर चक्री उपोषण करत आहे.
तर दुसरीकडे सभासद शेतकरी यांनी देखील कारखान्यासमोर तसेच शिवछत्रपती रंगभवन उद्यानासमोर चक्री उपोषण सुरू केले आहे. उद्योजक केतन शहा आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन धर्मराज कडादी यांच्यातील बाचाबाची नंतर विमानसेवेवरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेला आहे. दरम्यान साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसत श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याच्या समर्थनार्थ विजापूर रोडवरील हत्तुरमध्ये रास्ता रोको आंदोलन करत लक्ष वेधले. यावेळी विविध घोषणा देत विकास मंचला निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी धर्मराज काडादी यांनी आपल्या मनोगतात सोलापूर विकासमंचच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला. यावेळी असंख्य शेतकऱ्यांनी रस्ता रोको केल्यामुळे सोलापूर विजयपूर मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. याप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

















