सोलापुरात घटस्फोट देण्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांनी लोखंडी रॉड व काठीने मारहाण केल्याने या मारहाणीत 27 वर्षे तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. सदर घटना शनिवारी रात्री घडली असून नितीन अनिल पतंगराव वय 27 वर्ष रा. हुचेश्वर नगर, कुमठा नाका जवळ सोलापूर असे मृत झालेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे.
04 फेब्रुवारी 2023 रोजी नितीन हा कामावरुन घरी येत असताना मुलीला घटस्फोट देण्याच्या कारणावरून महेश श्रीपती शेजेराव, हर्षवर्धन महेश शेजेराव व इतर 8 ते 10 जणांनी मिळून लोखंडी रॉड व काठीने त्यास मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या मारहाणीत नितीनच्या डोक्यास मार लागला व खांद्यास मार लागल्याने सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते. त्यांनतर त्यास पुढील उपचारासाठी मार्कंडेय सोलापूर रुग्णालय येथे हलविण्यात आले.
दरम्यान त्याला तेथून पुन्हा पुढील उपचाराकरिता छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारापूर्वीच नितीनचा मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. नितिन पतंगराव यांच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना मिळताच शासकिय रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली आहे. सध्या शवविच्छेदन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.



















