सोलापूर : युवा भिमसेना सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हुसेन बागवान, सुनील काळे, प्रकाश गायकवाड, वैशाली डोलारे, विकास गायकवाड, मल्लू कांबळे यांचा सहभाग होता.
यावेळी महेश डोलारे म्हणाले, सध्या महाराष्ट्र व कर्नाटक सीमा प्रश्न पेटला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील बरीचशी गावे सोयी सुविधा मिळत नसल्याने कर्नाटक राज्यात समावेश होण्यासाठी जावू इच्छित आहेत. या प्रकरणात राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा व स्थानिक नेत्यांचा निष्काळजी दिसून येतो. याला आळा घालण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती कारवाई करावी, सीमावर्तीय भागातील गावांना विशेष निधी द्यावा, बेरोजगारांना रोजगार द्यावाझ शेतकऱ्यांना पाणी द्यावे अशी मागणी केली.
दुसरीकडे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष सोहन लोंढे यांच्या नेतृत्वाखाली भजन आंदोलन करण्यात आले या आंदोलनात युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज मोरे, शहराध्यक्ष रोहन कामने यांच्यासह इतर युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सोहन लोंढे म्हणाले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे थेट कर्ज योजनेसाठी समाविष्ट असलेल्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये दोन सक्षम जामीनदार घेण्याची अट घालण्यात आलेली आहे ती शिथिल करावी, अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर हा 500 च्या वर आहे किंवा कसे ही अट देखील जाचक आहे ती शिथिल करावी, सोलापूर जिल्ह्यातील लोकसंख्येप्रमाणे उद्दिष्ट वाढवून मिळावे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे लोंढे यांनी सांगितले.






















