सोलापूर : महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्न उपस्थित करत आयुक्त हटाव या मागणीसाठी महापालिकेचे ज्येष्ठ कामगार नेते अशोक जानराव यांनी मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हा परिषदेवर आला. चले जाव चले जाव शिवशंकर चले जाव चा नारा कामगारांनी दिला. जानराव यांच्या मोर्चाने लक्ष वेधून घेतले. या मोर्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मनीष काळजे यांचाही सहभाग होता. मोर्चा नंतर पोलिसांनी कामगार नेते अशोक जानराव यांना ताब्यात घेतले. यावेळी मनीष काळजे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते.
मागील अनेक दिवसांपासून सोलापूर महापालिकेत आयुक्त शिवशंकर हटाव मोहीम सुरू झाली आहे. काही अधिकारी आयुक्तांच्या जागेवर येण्यास इच्छुक असल्याने आयुक्तांना हटवण्यासाठी अशाप्रकारे फिल्डिंग लावली जात असल्याची चर्चा माध्यमातून सुरू आहे.

















