सोलापूर : 15 ऑगस्ट देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन केवळ पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने प्रत्येक घरावर तिरंगा फडकणार आहे. त्याच हर घर तिरंगा या उपक्रमाची जनजागृती जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोशात सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या आयोजित सायकल रॅलीत पोलीस अधीक्षक कार्यालय, एसआरपीएफ च्या तुकडीने उत्साहात सहभाग नोंदवला. यात लोकप्रतिनिधी सुद्धा मागे नव्हते.
आसरा चौकात ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, उपजिल्हाधिकारी सुमित शिंदे, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, तहसीलदार अमोल कुंभार, तहसीलदार जयवंत पाटील, एसआरपीएफचे सहाय्यक समदेशक माशाळे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, तहसीलदार अमोल वाकडे, तहसीलदार मोहाळे यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगाच्या जनजागृती सायकल रॅलीला सुरुवात झाली.
ही रॅली विमानतळ, सिद्धेश्वर साखर कारखाना अशी होटगी गावात आली. वाटेत होटगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गुलाबाच्या पाकळ्या उधळून या रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर होटगी गावच्या वेशीत एन्ट्री करताच शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांनी ‘भारत माता की जय’ या जय घोषात टाळ्या वाजवून रॅलीचे स्वागत केले. ही रॅली होटगी गावाच्या बाहेरील असलेल्या बालाजी मंगल कार्यालयात विसर्जित झाली या ठिकाणी गावातील 75 नागरिकांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले.
या रॅलीचे माजी उपसभापती रामप्पा चिवडशेट्टी, होटगीच्या सरपंच लक्ष्मीबाई गायकवाड, उपसरपंच असीम शेख, ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत लांडगे, काशिनाथ गंगदे, मल्लिकार्जुन पटणे, राजिया नदाफ, शिवलीला कोरे, सुवर्णा पाटील, बानू तांबोळी, यांच्यासह नायब तहसीलदार लटके, नायब तहसीलदार जाध, गायकवाड व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी स्वागत केले.
आमदार देशमुख म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारत स्वतंत्र करण्यात अनेकांनी बलिदान दिले आहे या बलिदानाची आठवण करून प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावावा, देशप्रेमाप्रती असलेली ऊर्जा हीच खरी आपली ताकद आहे.
जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांनी घरोघरी झेंडा लावावा यासाठी जनजागृती करण्यात येत असून सोलापूरकरांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावून देशाची शान वाढवावी.
पोलीस अधिक्षक सातपुते म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाले आहे हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रत्येकाने सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार लटके आणि उपसरपंच असीम शेख यांनी मानले. होटगी ग्रामपंचायतच्या वतीने बालाजी मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले होते.





















