सोलापूर : शहरामध्ये एका खाजगी फायनान्सच्या कर्जाचे हप्ते फेडणे होत नसल्याने एका विवाहित युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान नातेवाईकांनी संबंधित फायनान्सच्या कर्मचाऱ्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे.
लक्ष्मण सिद्राम कडली राहणार पश्चिम मंगळवार पेठ कामठी गल्ली सोलापूर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याने काही कारणानिमित्त एका खाजगी फायनान्स कङून दीड लाख रुपये लोन घेतले होते. यातील काही रक्कम त्याने फेङली ही होती. घरचा कर्ता पुरुष असल्याने व घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्यामुळे लक्ष्मण याने खाजगी फायनान्सकङून कर्ज घेतले होते.
उर्वरीत हफ्ते फेडणे शक्य होत नसल्यामुळे या फायनान्सकडून लक्ष्मण सिद्राम कडली यांना व त्यांच्या कुटुंबियांना सातत्याने मानसिक ञास देण्यात येत होता. त्या ञासाला कंटाळून अखेर लक्ष्मणने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शवविच्छेदनासाठी मृतदेह सिव्हिल हाॕस्पिटल येथे आणला असता नातेवाईकांनी टाहो फोडला.
लक्ष्मणच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा, अडीच वर्षाची मुलगी व आई असा परिवार आहे. या प्रकरणी संबंधित फायनान्सच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांवर जोङभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांकङून करण्यात आली असून गुन्हा दाखल होऊन संबंधितांना तात्काळ अटक करावी अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका नातेवाईकांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली. दरम्यान हे बजाज फायनान्स असल्याचे समोर आले आहे.


















