पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, धम्मचक्र प्रवर्तन दिन -२०२२ चे समितीचे पदाधिकारी व सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकीची प्रस्तावना उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दि. ०५/१०/२०२२ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन – २०२२ सांगता मिरवणुक आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सुचना देण्यात आल्या. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र राखावे, मंडाळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास त्यामुळे गर्दी होणार नाही याची दक्षता घेवून आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.
मंडाळांनी महावितरण विभागाकडुन अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होवून इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आरटीओ कडुन तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. इतर धर्मांच्या भावना दुखावणार नाही सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. धम्मचक्र प्रवर्तन दिन मंडळानी परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी. तसेच ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे व पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ) कार्यालय, येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व धम्मचक्र प्रवर्तन समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगर पालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघुन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.
पोलीस आयुक्त यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, पोलीस २४ तास उपलब्ध आहेत. शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सुचना पाळल्या पाहिजेत. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू असे आश्वासने देवून बैठकीला उपस्थितांचे आभार मानून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.





















