सोलापूर : काँग्रेस पक्षाची सेवादल ही संघटना पक्षाची ‘रीड की हड्डी’ म्हणून समजली जायची. पक्षाचा पाया मजबूत करण्याची जबाबदारी या संघटनेवर आहे. परंतु सोलापुरात आता ही संघटना आहे की नाही? असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. पक्षाचा कोणताही कार्यक्रम सेवादल कडून होत नाहीत केवळ महाराष्ट्र दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, काँग्रेस स्थापना दिन यावेळी झेंडा बांधणे, काढणे आणि फडकावणे एवढ्यासाठीच या संघटनेचा वापर उरला आहे का? असाही प्रश्न आता कार्यकर्ते विचारत आहेत.
यापूर्वी काँग्रेसची सेवादल संघटना अतिशय आक्रमक होती. माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा यांच्या काळात ही संघटना सक्रिय दिसायची. त्यावेळचे अध्यक्ष हे सुद्धा सक्रिय दिसत होते. महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असताना स्थायी समिती सभापतींचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद देण्यात आले. ते अध्यक्ष केवळ काँग्रेस भवनात बसून असतात. आता ही काही आर्थिक व्यवहार तेच सांभाळतात अशीही चर्चा काँग्रेस मध्ये सुरू झाली आहे.
सेवादल यंग ब्रिगेडच्या नावाखाली काही नेत्यांनी मोठी पदे घेऊन केवळ मिरवण्यासाठी त्या पदाचा वापर केला जातोय अशी ही कुजबुज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये ऐकण्यास मिळते.
सोलापुरात काँग्रेस पक्ष सध्या महापालिकेत पिछाडीवर आहे. भविष्यात पुन्हा महापालिकेची सत्ता ताब्यात मिळवायचे असेल तर अशा सेवादल संघटनाने आक्रमक होऊन पक्षाची विचारधारा पुन्हा जनमानसात पोहोचवण्याची गरज आहे. रविवारी सोलापुरात काँग्रेसच्या चार माजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पक्षाचा मोठा कार्यक्रम होत आहे, त्यामुळे यासह इतर संघटनांच्या कामकाजाबाबत चिंतन होणे हे तितकेच गरजेचे आहे.

















