सोलापूर : सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करून व्यसनाधीनतेच्या आहारी घेऊन जाणाऱ्या विषारी ताडी विक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने विषारी ताडी विरुद्ध जनजागृती अभियान हाती घेऊन श्रमिक कष्टकऱ्यांचे प्रबोधन केले. तसेच मोर्चा, धरणे आंदोलन आणि संबंधित सर्व अधिकारी व मंत्री महोदयांशी पत्रव्यवहार केले. तरीही राज्य उत्पादन शुल्काकडून नागरिकांच्या रास्त मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली व राजरोसपणे विषारी ताडी विक्री केंद्र चालू आहेत.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबवून २५ हजार सह्यांचे निवेदन ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मास्तर यांच्याकडे सुपूर्द केले. हे २५ हजार सह्यांच्या निवेदनाचे संच आडम यांनी सोमवार दि. २२ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्र विधान भवन येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री यांनी नागरिकांच्या मागणीबाबत स्वतः हस्तक्षेप करून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांना विषारी ताडी विक्री केंद्र बंद करण्याचे लेखी आदेश देण्यास सांगितले. अशी माहिती माध्यमांशी बोलताना कॉ. आडम मास्तर यांनी दिली.


















