सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यांनी हॉटेल सिटी पार्क येथे शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचे बैठक घेतली संघटनात्मक बांधणी सदस्य नोंदणी याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. तत्पूर्वी जयंत पाटील हे सोलापूरला येण्यापूर्वी ते काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत निलंगा या ठिकाणी एका कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यावेळी पाटील हे सोलापुरात येणार असल्याने सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या सात रस्ता इथल्या जनवात्सल्य या निवासस्थानी चहासाठी यावे असे निमंत्रण दिले होते. त्या विनंतीला मान देऊन रात्री उशिरा जयंत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे शहर निरीक्षक शेखर माने हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. तब्बल अर्धा तास पाटील यांची शिंदे यांच्यासोबत ‘चाय पे चर्चा’ झाली. काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी जयंत पाटील यांच्या हातात हात दिल्याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दोन वेळा पराभव झाल्याने ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत तशी मागणी ही करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरोटे हे जयंत पाटील यांना “साहेब खासदारकी आमचीच” असे तरी सांगत नसतील ना अशा चर्चेला आता उधाण आले आहे.

















