सोलापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र – कर्नाटक सिमावादावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या भावना तीव्र असल्या तरी त्यांनी संयम बाळगावा असं आवाहन ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केलं आहे.
सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा सिमावादाचा प्रश्न पुन्हा उफाळून आला असून, यावरुन आरोप-प्रत्यारोपांमुळं वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. सोलापूर जिल्ह्य़ातील अक्कलकोट तालुक्यातील 28 गावांतील नागरिकांनी तडवळ इथं एकत्रित येत कर्नाटक मध्ये जाण्याचा निर्धार करुन तशा प्रकारचा ठराव केल्यानं सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. नागरीकांच्या भावना याप्रश्नी अत्यंत तीव्र दिसून येत आहेत. लोकप्रतिनिधींच्या ही या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
या पार्श्वभुमीवर भाजपाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील जनतेनं संयम बाळगावा असं आवाहन केलं आहे. वीज, रस्ते, पाणी याप्रश्नी 28 गावांतील जनतेच्या भावना या निश्चितचं रास्त आहेत. मात्र त्यांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव करणं योग्य नाही. आपण अक्कलकोट तालुक्यातील 28 गावच्या जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री तसचं उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही सिद्रामप्पा पाटील यांनी दिली.
अक्कलकोट तालुक्यात विशेषतः तडवळ भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. यामुळं जनतेचे मोठे हाल होत आहेत. ज्या ठिकाणी रस्ते हवेत, त्याठिकाणी ते झालेचं नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं जनतेच्या सर्व प्रश्नांसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना एकत्रित घेऊन आपण सरकारकडं युध्दपातळीवर प्रयत्न करु. जनतेन या प्रकरणी शांत राहून सहकार्य करावं,असंही आवाहन करत आपण या प्रश्नावर जनतेला निश्चितचं न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही देखील पाटील यांनी अक्कलकोट तालुक्यातील सिमावर्ती भागातील जनतेला दिली आहे.



















