सोलापूर :- सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिध्देश्वर मंदिरासमोरील दोन्ही रस्त्यांना गटारीच्या घाण पाण्याचा आणि अतिक्रमणाचा विळखा पडला असून दोन दिवसात अतिक्रमण काढण्यात यावे आणि पादचारी मार्गासह वाहतुकीला रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा पालिकेच्या प्रवेशद्वारात निद्रा आंदोलन करून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देऊ.असा इषारा सकल लिंगायत महासमितीचे राज्य समन्वयक डाॅ.बसवराज बगले यांच्यासह लिंगायत संघटनांच्या प्रमुखांनी दिला आहे.
सोलापूर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शीतल उगले आणि पोलीस आयुक्तांना महाराष्ट्र लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक डाॅ.बसवराज बगले,शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सारणे यांनी हे निवेदन सादर केले.
ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरासमोर गेल्या दोन महिन्यांपासून गटारीचे पाणी,घाणीचे साम्राज्य,लाकडी व लोखंडी फर्निचरांचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. पादचारी मार्ग हरवले असून मुख्य रस्ता गायब झाला आहे.चेंबर तुंबले असून रस्त्यावरील ड्रेनेजचे पाणी वाहात आहे.बेकायदेशीर अतिक्रमणामुळे या परिसरात एकेरी वाहतूक होत आहे. मंदिरासमोरचे अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छतेसाठी सिध्देश्वर भक्तांनी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला दोन दिवसांचा वेळ दिला आहे.
ग्रामदैवत सिध्देश्वर दर्शनासाठी शहरातील आणि परगावचे हजारो भाविक रोज येत असतात.आत्ता गड्डा यात्रेची तयारी सुरू झाली आहे.मंदिर परिसर भक्तांनी गजबजणार आहे.या पार्श्वभूमीवर लिंगायत समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून या गंभीर विषयांबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
सिध्देश्वर मंदिरात पायी चालत येणारे गावातील भक्त लक्ष्मी मंडई जवळील पूर्वेच्या गेट मधून ये – जा करू शकत नाहीत.लोखंडी सामान,बेकायदा उभारलेली खोकी आणि गेटसमोर थांबणाऱ्या मालवाहतूक वाहनांचा अडथळा होत आहे. पूर्णपणे पालिकेच्या रस्त्यावर बस्तान मांडलेल्या अवैध धंद्याकडे प्रशासनाचे का दूर्लक्ष आहे.असा सवालही डाॅ.बगले यांनी केला आहे.पूर्वेकडील मंदिराचे प्रवेशद्वार तात्काळ मोकळा झाला पाहिजे. अशीही मागणी अनेक नागरिकांकडून होत आहे.
या शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पार्क चौकाकडे जाणारा तसेच लक्ष्मी मंडई मार्गे गावात जाणारा वाहतुकीचा हा एकमेव रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणांच्या विळख्यात आहे.होम मैदानाकडील मंदिरासमोरच्या रस्यावर गेली अनेक महिने ड्रेनेजचे घाण पाणी रात्रंदिवस वाहत असून दुर्गंधी पसरली आहे.तरीही त्या रस्त्यावर खोकेधारक लाकडी फर्निचर मांडून अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे.शिवाय डांबरी रस्ता खराब झाला आहे.
हे अतिक्रमण निद्रिस्त प्रशासनाला दिसत नसेल तर सिध्देश्वर भक्तांना हातात कायदा घ्यावा लागेल असा इशाराही लिंगायत संघटनांनी दिला आहे.येत्या दोन दिवसांत मंदिरासमोरचा दक्षिणेकडचा रस्ता आणि पूर्वेकडील प्रवेशद्वार अतिक्रमण मुक्त न झाल्यास गुरूवार पासून महानगरपालिके समोरील प्रवेशद्वारात निद्रा आंदोलन करून प्रशासनाला बांगड्यांचा आहेर देण्यात येईल.असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



















