सोलापूर : विमानसेवेचे निमित्त पुढे करून काही दुष्ट मंडळींच्या कपट कारस्थानातून प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यास दिलेली नोटीस मागे घ्यावी यासाठी गेल्या 32 दिवसांपासून सुरू असलेल्या चक्री उपोषणाची प्रशासनाने दखल न घेतल्याच्या निषेधार्थ सिध्देश्वर राष्ट्रीय साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार व शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे (चपळगाव) यांनी आपल्या रक्तांनी जळजळीत पत्र लिहून कारखान्याविरुध्दच्या सर्व नोटिसा मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कारखाना बचावसाठी कारखान्याच्या कार्यस्थळावर गेल्या 32 दिवसांपासून कामगारांचे तर शेतकर्यांचे 31 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू आहे. बोरामणी येथे मंजूर असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करा, कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता होटगी रोड विमानतळाच्या 15 नंबर धावपट्टीवरून विमानसेवा सुरू करा, कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी कामगार आणि कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी सोलापूर-विजयपूर, सोलापूर-हैदराबाद या महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन केले.
19 डिसेंबर रोजी कारखान्यापासून होम मैदानापर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये कारखान्याचे कामगार, त्यांचे कुटुंबीय, शेतकरी सभासद व त्यांचे कुटुंबीय, कारखान्याचे हितचिंतक आदी सुमारे 25 हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या सर्व आंदोलनानंतरही प्रशासनातील एकाही अधिकार्याने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला नाही. त्या निषेधार्थ साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार व शेतकरी सभासद अनंतप्पा बुगडे यांनी स्वत:च्या रक्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून कामगार आणि शेतकरी सभासदांच्या संतप्त भावना मांडल्या आहेत.
सिध्देश्वर कारखान्यावर कामगारांचे 15 हजार आणि 28 हजार सभासदांचे कुटुंबीय तसेच ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक चालक-मालक यांच्याशिवाय प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक लोकांची उपजीविका अवलंबून आहे. कारखान्याच्या चिमणीला धक्का न लावता विमानसेवेसाठी बोरामणी येथील विमानतळ लवकरात लवकर कार्यान्वित करा. या नव्या विमानतळामुळे सोलापूरचा विकास होईल. जर कारखान्याच्या चिमणीला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर आम्हाला आत्मदहन करण्याची परवानगी द्या, अशी मागणी बिराजदार व बुगडे यांनी रक्ताळलेल्या पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. सदरचे पत्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.

















