सोलापूर : सोलापूर शहर अतिशय उत्सवप्रिय म्हणून ओळखले जाते. या सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा बसवेश्वर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा मिरवणूका निघतात. त्यासह आता रामनवमीनिमित्त मोठ्या मिरवणूका निघत आहेत.
महापुरुषांची जयंती आली की, अनेक मंडळाचे कार्यकर्ते पावती पुस्तके घेऊन वर्गणी गोळा करताना दिसतात. प्रशासकीय कार्यालयामध्ये या कार्यकर्त्यांचा वावर पाहायला मिळतो. विशेष करून बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, पीडब्ल्यूडी विभाग, पाणीपुरवठा विभागामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पावती देऊन वर्गणी मागितली जाते.
जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या याच विभागामध्ये सुद्धा सध्या वर्गणी मागताना काही कार्यकर्ते साहेबांच्या केबिन बाहेर थांबलेले पाहायला मिळत आहेत. दरवर्षी ठरल्याप्रमाणे अधिकारी आपल्या पद्धतीने वर्गणी देऊन सहकार्य करतात. जिल्हा परिषदेमधील काही कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करताना एक मजेदार किस्सा ऐकण्यास मिळाला.
आता तर काही ‘भाईजान’ सुद्धा जयंती वर्गणीच्या पावत्या घेऊन अधिकाऱ्यांसमोर बसत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या हातात जयंतीच्या पावत्या पाहून ‘अरे तुम क्यू मांग रहे हो’ तर त्यांनी उत्तर दिले म्हणे, साहब बाबा तो हमारे भी..! हे ऐकून त्या अभियंतांनी डोक्याला हात लावले.



















