सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या सायकल बँक या उपक्रमाला बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या सामाजिक दायित्व निधीतून तब्बल 25 सायकली भेट दिल्या. शुक्रवारी सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम जिल्हा परिषदेत संपन्न झाला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, झोनल मॅनेजर बॅक ऑफ महाराष्ट्र, सोलापुर झोन दत्तात्रय कावेरी, डेप्युटी झोनल मॅनेजर, बॅक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर झोन, नवनीत किंग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे, कृषि विकास अधिकारी विवेक कुंभार, लेखाधिकारी कैलास कुंभार, चंद्रकांत पाटील, संजय अंबोले यांच्यासह अर्थ विभागातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
सर्व अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आवारात सायकल फेरी मारून आनंद व्यक्त केला.
दरम्यान दत्तात्रय कावेरी म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांची सायकल बँक ही एक चांगली संकल्पना आहे, यामध्ये आमचा खारीचा वाटा म्हणून आमच्या बँकेच्या वर्धापन दिनी 25 सायकली सीएसआर फंडामधून दिल्या आहेत या उपक्रमातून निश्चितच ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची चांगली सोय होणार आहे.
सीईओ स्वामी म्हणाले, जिल्हा परिषदेची सायकल बँक हा उपक्रम आता चळवळ झालेला आहे. ग्रामीण भागातील मुली सायकल नसल्याने शिक्षणापासून वंचित होत्या परंतु या उपक्रमांतर्गत त्यांना सायकल मिळाल्याने निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढणार असल्याने ही सोलापूर जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असणार आहे.





















