आपण समाजामध्ये राहतो, समाजाचे काही तरी देणे लागतो, या उद्दात्त हेतूने या संस्थेचे उद्घाटन झाले आहे. आज महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यातल्या त्यात एक महिला युवती ही या संस्थेची संस्थापिका असून तिने अगदी शून्यापासून या संस्थेची स्थापना केली आहे. आज सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठीच अशा संस्थेची गरज आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुनंदा शेंडगे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमापूजन व संस्थेचे बॅनर प्रकाशित करून दीपप्रज्वलनाने झाले. त्यानंतर प्रास्ताविकेत संस्थेच्या अध्यक्षा श्रेया माशाळ यांनी मला समाजासाठी काहीतरी करायचे आहे, स्वतःसाठी कोणपण जगतोच पण दुसऱ्यासाठी जगणं हा आनंद वेगळाच असतो आणि दुसऱ्याला आनंद दिला की, आपल्याला आपोआप आनंद मिळतोच, असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्वतःचे विचार मांडले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात येऊन महिला युवतींना देखील महिला नाट्यमहोत्सवात पारितोषिक मिळाल्याबद्दल पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून जस्ट कॉल मी न्यूज २४ सोलापूरचे संपादक हेमंत निंबर्गी हे उपस्थित होते. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून प्रार्थना फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मोहिते, तसेच शक्ती कटकधोंड, प्रभाकर माशाळ, मनीषा माशाळ, अर्जुन टणके, नरसव्वा टणके आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी घोडके यांनी केले तर आभारप्रदर्शन “आम्ही क्रीअेटर्स” च्या संस्थापिका श्रेया माशाळ यांनी केले.


















