सोलापूर : डिसेंबर महिन्यातील तसे वाढदिवस विशेष असतात. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांचा विशेष करून समावेश असतो. तसेच सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांचाही डिसेंबरमध्ये वाढदिवस असतो. त्यामुळे डिसेंबर महिन्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. त्यातच आता डिसेंबर महिन्याला प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वही आलं आहे. त्याला कारण ही तसेच असून सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचा 4 डिसेंबर रोजी वाढदिवस.
सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून मिलिंद शंभरकर यांना येत्या जानेवारी महिन्यात तीन वर्षे पूर्ण होतील परंतु या तीन वर्षात या संवेदनशील, संयमी व सक्षम अधिकाऱ्याने सोलापूरला कोरोना सारख्या महामारीतून अलगदपणे बाहेर काढले दोन्ही लाटेशी ‘गंभीर’ कोरोनाशी त्यांनी ‘खंबीर’पणे लढा दिला आहे.
मुळात ‘मिलिंद’ या नावाचा अर्थच भाग्यवान, सृजनशील, गंभीर, सक्षम, आनंदी असा होतो. कोरोनाच्या संकटात दोन वर्षे आपल्या कुटुंबापासून दूर राहून, दोनवेळा कोरोना पॉझिटिव्ह होऊनही खंबीरपणे उभे राहिलेले मिलिंद शंभरकर. कलेक्टर या पदाचा रुबाब व थाटच वेगळा, परंतू वागण्यात त्या पदाचा अविर्भाव नसलेले शंभरकर, जिल्हाधिकारी असतानाही वयाने मोठ्या असलेल्या अधिकाऱ्यांला कायम सन्मानजनक वागणूक देणारे शंभरकर. प्रशासनाचा कारभार पारदर्शी चालवणारे शंभरकर. कामात संवेदनशीलता,संयम आणि प्रामाणिकपणा ठेवणारे शंभरकर”.
प्रशासकीय कामकाजात त्यांनी अनेक सुधारणा केल्या, डिजिटल सातबारा, फेरफार ऑनलाइन यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली, एका दिवसात 10 हजार फेरफार करण्याचे रेकॉर्ड सोलापूरने केले. मतदार नोंदणीत सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला याचे श्रेय प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना जाते, एखाद्या कामाचा पाठपुरावा करणे, बैठका लावून आढावा घेणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
केंद्र सरकारचा सुरत-चेन्नई हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. या कामात सर्वात प्रथम सोलापूर जिल्ह्याने भूसंपादन केल्याबद्दल केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचे आभार व्यक्त केले ही त्यांच्या कामाची शाबासकी होती.
सुंदर माझे कार्यालय या अभियानात सोलापूर जिल्ह्यात उत्कृष्ट असे काम झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाचे कौतुक करत जिल्ह्यासाठी पाच कोटी निधी देण्याची घोषणा केली.
कष्टकरी कामगारांसाठी कुंभारीच्या शिवारात होत असलेल्या 30 हजार घरकुलाच्या रे नगर प्रकल्पासाठी शंभरकर यांचा कायम पाठपुरावा राहिला आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा हे त्यांनी आता प्रमुख ध्येय ठेवले आहे. वाराणसीच्या धरतीवर पंढरपूर तिर्थक्षेत्राचा विकास करण्याचं त्यांचं नियोजन असून त्याला लोकप्रतिनिधी आणि पंढरपूरच्या नागरिकांनी साथ देणे तितकेच महत्त्वाचे आहे. असा एकही आमदार असेल सोलापुरातील नागरिक असतील अशा कुणाची एकही तक्रार जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात नाही ही त्यांच्या कामाची पावती म्हणावी लागेल.


























