सोलापूर : मागील अनेक महिन्यापासून शासनाने गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारावर निर्बंध लादल्याने लाखो मिळकतधारक अडचणीत अडकले आहेत. तरी या लाखो मिळकतधारकांची अडचणीतून मुक्तता करण्यासाठी सरकारने गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहाराला परवानगी द्यावी अशी मागणी संभाजी आरमारने शासनाकडे केली आहे.
सोलापूर शहर परिसरातील विशेषतः हद्दवाढ भागातील जवळपास ९०% हुन जास्त मिळकती गुंठेवारीच्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून सरकारने गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारावर प्रतिबंध आणले आहेत. सरकारनेच गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहाराला मान्यता दिल्याने नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून, वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन अशा मिळकती खरेदी केल्या आहेत. आणि आता अशाप्रकारे गुंठेवारी मिळकतीच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालून लाखो मिळकतधारकांवर अन्याय केला जात आहे.
गुंठेवारी दस्त नोंदणी बंद असल्यामुळे हजारो नागरिक मिळकत विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य, शिक्षण, घरगुती अडचणी निवारण्यासाठी स्वमालकीची मिळकत असूनही विक्री करता येत नसल्याने अनेकांना खाजगी सावकारीचा आधार घ्यावा लागत आहे. जनतेच्या मूलभूत हक्कावर ही एकप्रकारे सरकारने आणलेली गदाच आहे. सोबतच असे व्यवहार नोंदणी थांबवून कोट्यवधींच्या सरकारी महसुलाचे देखील नुकसान झाले आहे. लाखो मिळकती कवडीमोल किंमतीच्या होत असून अडचणी निवारण्यासाठी मार्ग नसल्याने नाईलाजास्तव नोटरी व्यवहाराने अत्यल्प किंमतीत या मिळकती विक्री होत आहेत. सरकारने याप्रश्नी तात्काळ लक्ष घालून गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहारावर लादलेले निर्बंध हटविणे गरजेचे आहे.
तरी या निवेदनाद्वारे संभाजी आरमारची सरकारकडे आग्रही मागणी आहे की, लाखो लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनलेल्या गुंठेवारी खरेदी-विक्री व्यवहाराला रितसर मान्यता द्यावी. अन्यथा लाखो मिळकतधारकांच्या न्याय-हक्कासाठी संभाजी आरमारला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल याची कृपया नोंद घ्यावी असा इशारा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उपशहरप्रमुख सागर ढगे, विद्यार्थीप्रमुख सोमनाथ मस्के, आनंद थिटे, संगप्पा म्याकल आदींनी दिला आहे.


















