सोलापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे 41 दिवसाच्या प्रशासकीय ट्रेनिंग साठी मसूरी या ठिकाणी गेले आहेत त्यांच्या पश्चात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
शुक्रवारी पदभार घेतल्यानंतर सोमवारी दिवसभर कोहिनकर यांनी बांधकाम विभागाचा आढावा घेतला. मार्च अखेर असल्याने जिल्हा नियोजन समितीचा निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान सोलापूर जिल्हा परिषदेसमोर असून ते आव्हान कोहिनकर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करायचे आहे. त्यामुळे सर्वच विभागाच्या बांधकामाचा आढावा घेत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलीच तंबी दिली असून कोणत्याही परिस्थितीत मार्च महिना अखेर शंभर टक्के निधी खर्ची पडला पाहिजे असे त्यांचे नियोजन आहे.
मंगळवारी सीइओ दिलीप स्वामी यांच्या चेंबरच्या बाहेर कोहीनकर यांच्या नावाची पाटी प्रभारी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अशी लावलेली दिसून आली. कोहिनकर यांच्या कार्यालयाचे नूतनीकरण सुरू असून ते आता दिलीप स्वामी यांच्या चेंबरमध्येच काही दिवस बसणार आहेत.



















