सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह तब्बल 40 आमदार फुटल्याने शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना या पक्षावर आता एकनाथ शिंदे गटाने दावा केला आहे. पक्षाचे धनुष्यबाण या चिन्हासाठीही या दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याला अनिल कोकीळ हे नवे संपर्क प्रमुख मिळाले आहेत. कोकीळ हे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी शासकीय विश्रामगृहात शहराच्या उत्तर, दक्षिण व मध्य मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकारी व सदस्यांना 100 रुपयेच्या बॉण्डवर प्रतिज्ञापत्र लिहून देण्यास सांगितले. प्रतिज्ञापत्राचा बॉण्ड घेण्यासाठी झुंबड उडाली. यासोबत आपले आधारकार्ड जोडून द्यायचे होते. या प्रतिज्ञापत्रात,
माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वांवर अढळ निष्ठा आहे.
मी असेही प्रतिज्ञापूर्वक सांगतो की, आदरणीय शिवसेनापक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठींबा आहे. आदरणीय शिवसेनापक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या प्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्चः पुष्टी करीत आहे. व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन याची या प्रतिज्ञापत्राद्वारे ग्वाही देत आहे.






















