सोलापूर : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर या शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होत्या. त्यांच्या उपस्थितीत सोलापुरात सत्ता संपादन मेळावा घेण्यात आला. त्यानंतर त्या सायंकाळी शासकीय विश्रामगृहात थांबल्या असता पत्रकारांशी त्यांनी गप्पा मारल्या.
मेळाव्याच्या तोंडावरच शहराध्यक्ष हजरत अली बडेखान, शहर युवक अध्यक्ष अमर ज्ञानदेव पवार यांनी राजीनामे दिले तसेच जिल्हा युवकाध्यक्ष जावेद पटेल यांनी पक्ष सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला. हा प्रश्न विचारला असता त्यांनी हा विषय इतका मनावर घेतला नाही, पक्षात गटबाजी असते, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्न समस्या ऐकल्या पाहिजे, जरी हे सोडून गेले असले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, शिवसेनेचे तर 40 फुटले त्यासमोर आम्ही काही नाही असे उत्तर देतानाच त्यांनी पक्ष सोडून गेलेले जर पुन्हा येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, संपूर्ण महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यात दौरा नियोजित आहे. गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या पद्धतीने आम्ही संघटना बांधणी केली आहे. तालुका लेवल बांधणी पूर्ण झाली असून जिल्हा परिषद गणा नुसार आता तयारी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कार्यकर्त्यांसोबत संवाद आवश्यक असून त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असते म्हणून सत्ता संपादन मेळाव्याच्या माध्यमातून संघटना बांधणी करीत आहोत.






















