चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी
घेतला पावलांनी वसा
टाळ घोषातुनी साद येते तुझी
दावते वैष्णवांना दिशा
सोलापूर : ‘ध्यास हा जिवाला पंढरीशी जाऊ। पंढरीचा राणा डोळे भरून पाहू’ असे म्हणत आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोमवार ४ जुलै रोजी दुपारी ११ वाजून ४५ मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून स्वागत केले. यंदा चार पदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने धर्मपुरी येथे जागा नसल्याने कारुंडे येथे पालखीचे स्वागत झाले. प्रारंभी माऊलीच्या अश्वाची पूजा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली.



संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितल जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रदीप ढेले, mseb चे अधिक्षक अभियंता सांगळे, पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुजे, डॉ अनिरुद्ध पिंपळे, तहसिलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव आदी उपस्थित होते.
तसेच सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अप्पर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राधाकिशन पवार यांनी माऊलीच्या पालखीला भावपूर्ण निरोप दिला.
पालखी अगमनापूर्वी आयोजित कार्यक्रमात कारुंडे येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रबोधन पर गीतातून आरोग्य दिंडी जनजागृती करण्यात येत होती. वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी साठीची सोय झेडपी आरोग्य विभाामार्फत करण्यात आली होती. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने sanitary नॅपकिन व्हेंडींग मशीन ठेवण्यात आली होती.
जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पालखी मार्गावर फिरत्या शौचालयाची सोय करण्यात आली होती. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते पंढरपूर स्वच्छ वारी स्वस्थ वारी निर्मल वारी – हरित वारी लोकशाही वारी या दिंडीतून वारकऱ्यांचे प्रबोधन केले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंडीचे मानकरी सोपान काका टेंभुकर महाराज यांचा व दिंडीत ५० वर्षापासून वीणा वाजविणारे कारुंडे गावचे ज्येष्ठ नागरिक यांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सत्कार केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या हरित वारी या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
सकाळपासूनच ऊन आणि ढगाचा खेळ सुरु होता. अशा वातावरणात वारकर्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपझप पडत होती. दिंड्यादिंड्यामध्ये भजनाला रंग भरत होता. सकाळचे काकड्याचे अभंग दिंड्यादिंड्यामधून गायले जात होते. टाळ, मृदुंगाच्या सुरेख साथीने गोड व कर्णमधुर चालीने वातावरण प्रसन्न बनले होते. पंढरी समीप आल्याने वारकर्यांमध्ये उत्साह संचारला होता.