सोलापूर – कुंभारी जवळ होत असलेल्या रे नगर वसाहतीत पिण्याचे मुबलक पाणी, पावसाळी गटार, ड्रेनेज, अंतर्गत रस्ते याकरिता म्हाडा मार्फत मुख्य अभियंता-२ म्हाडा प्राधिकरण यांचा २३ ऑगस्ट २०२२ च्या प्रस्तावानुसार शासन निर्णय दि. २० एप्रिल २०२२ रोजी २२४.९२ कोटी वर वाढीव झालेल्या प्रस्तावाद्वारे जवळजवळ ३०० कोटी रुपये निधी मंजूर झालेले असून पायाभूत सुविधांचा शुभारंभ करण्यासाठी अल्पावधीतच विद्यमान शासनाकडून मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्यप्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी दिली.
पुढे आडम म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रे नगरच्या पहिल्या टप्प्यातील १० हजार घरांचे हस्तांतरण कार्यक्रम योजिले होते. परंतु पायाभूत सुविधांच्या अभावी सदर कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले. तो कार्यक्रम या विद्यमान सरकारने मंजूर केलेल्या ३०० कोटी निधीमुळे एका वर्षात साधारणतः १५००० घरांचे बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण होईल. या अनुषंगाने पंतप्रधान आवास योजना कार्यालयाकडे सल्लामसलत केले असून दि. १ मे २०२३ रोजी मा.पंतप्रधान यांच्या हस्ते १५ हजार घरांचे हस्तांतरण तर उर्वरित १५ हजार घरे २३ मार्च २०२४ रोजी महामहीम राष्ट्रपती यांच्या हस्ते हस्तांतरण करण्याचा दृढविश्वास आडम यांनी व्यक्त केला.
तसेच, सदर प्रकल्पाच्या ठिकाणी वीज जोडणी करिता वीज महामंडळाकडून पहिल्या टप्प्यातील १० हजार घरांचे साधारणतः १८ कोटी खर्चाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित ४० कोटी रुपयांचे काम डिसेंबर अखेर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या वसाहतीत पथदिवे, २४ तास पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
जगाच्या पाठीवर असंघटीत कामगारांकरिता भारत देशातील सर्वात मोठा अभूतपूर्व महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प म्हणून रे नगरचा इतिहास रचला जाईल. येणाऱ्या पिढीकरिता एक आदर्श असे संघर्षातून मिळविलेल्या वसाहतीची ओळख हि इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिली जाईल. असे कार्य ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या भगीरथ प्रयत्नातून झालेले आहे. याकरिता अहोरात्र संघर्षात आलेल्या लढाऊ कामगारांचे तसेच प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी विशेष सहकार्य केलेल्या मा. केंद्र व राज्य शासनातील मंत्री महोदयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.



















