सोलापूर : राज्यातील सत्ता बदल झाला आणि आता नेते व आमदार भाजपच्या गळाला लागू लागले आहेत. भाजपने आपले ऑपरेशन लोटस हे आता सोलापूर जिल्ह्यात सुरू केले आहे, त्याला यश सुध्दा मिळताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील असे तिघे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याकडून मिळाले होती.
सोमवारी दुपारच्या सुमारास काही प्रसार माध्यमांमधून मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासोबत आता माढयाचे पाच टर्म निवडून आलेले आमदार बबनदादा शिंदे हे सुद्धा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
यावरून भाजप निश्चितच सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पाडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान मोहोळची माजी आमदार राजन पाटील आणि माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी साखरेच्या निर्याती संदर्भात भेट घेतल्याचे वृत्त असून सदरची भेट राजकीय नसल्याचा निर्वाळा त्यांच्या निकटवर्तीयांनी दिला आहे.
मात्र काही दिवसांपूर्वी इडीकडून आमदार बबनदादा शिंदे यांची चौकशी झाल्याची माहिती समोर आली होती. त्याचबरोबर भीमा साखर कारखान्याच्या निवडणूक अर्ज भरतेवेळी खासदार धनंजय महाडिक यांनी नकळत राजन पाटील यांना इडीच्या कारवाईची धमकी दिली होती त्यामुळे तर या दोन नेत्यांची भेट नाही ना असा तर्क वितर्क काढला जात आहे.



















