सोलापूर दि.३०:- भारतासारख्या देशात आहे रे आणि नाही रे या दोन वर्गात कधीही न संपणारी दरी आहे. याचे कारण या देशातील उत्पादन साधनाची मालकी मुठभर लोकांच्या हातात एकवटलेली आहे. भांडवलदार आणि मालक वर्ग हे नफेखोरी साठी श्रमिकांकडून त्याच्या क्षमतेहून अधिक नाममात्र मोबदल्यात श्रम करवून घेतले जाते. म्हणून कामगार संघटनांच्या माध्यमातून श्रमिकांना त्याचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सिटूने गेली ५ दशके अविरतपणे रस्त्यावरची लढाई, सभागृहात लढाई आणि न्यायालयीन लढाईच्या रूपाने कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरुद्ध न्याय मिळवून देण्यात अग्रेसर राहिलेला आहे. कारण कामगार हा क्रांतीची अग्रदल आहे. कामगारांना त्यांच्यावर होणाऱ्या शोषणाची जाणीव करून देऊन शोषणा विरुद्ध लढण्याची ऊर्जा देण्याचे काम सिटूने केलेले आहे. या देशात कामगाराला स्वाभिमानाने माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांच्या राहणीमानाचा दर्जा आणि आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थैर्य आवश्यक आहे. त्यासाठी वर्ग संघर्षाशिवाय पर्याय नाही. कारण वर्ग संघर्ष हा श्रमिकांचा आत्मा आहे. पण आज कामगार कायद्यातील केंद्र सरकारच्या प्रतिगामी बदलामुळे आणि जनता विरोधी धोरणांमुळे मरणालाही कर भरावे लागत आहे. या कोरोना महामारीच्या काळात सुद्धा जीएसटी मधून अत्यावश्यक आणि वैदकीय सुविधा, साधने आणि औषधे वगळण्यात आलेले नाही. याहून दुसरे दुर्दैव असू शकत नाही. अशी जळजळीत टीका सिटूच्या वर्धापनदिनी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केली.
रविवार दि. ३० मे रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने ज्येष्ठ कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविका कॉ. सुनंदाताई बल्ला यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ५१ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर नसीमा शेख, व्यंकटेश कोंगारी, कुर्मय्या म्हेत्रे, सिद्धप्पा कलशेट्टी, रंगप्पा मरेड्डी, म.हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, अनिल वासम,आदी उपस्थित होते.



















