सोलापूर : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागामध्ये शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवे आदेश काढले. कोरोना ओमीक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढण्यात आले आहेत. शिवजयंतीचा उत्सव साजरा करा मात्र साधेपणाने असे त्यात नमूद करण्यात आले असून जिल्हाधिकारी शंभरकर यांनी काढलेल्या आदेशात पुढील प्रमाणे सूचना करण्यात आल्या आहेत…
19 फेब्रुवारी रोजी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करु नये, असे आवाहन राज्य शासनाने केले आहे. शिवज्योत वाहण्यासाठी 200 भाविकांना व शिवजयंती तर उत्सवाकरिता 500 भाविकांना परवानगी देण्यात आली आहे.
शासकीय आदेशात म्हटले आहे की, प्रभात फेरी, बाईक रॅली अथवा मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला/ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावेत. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.


















