सोलापूर : सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील सात ते आठ चंदनाची झाडे तोडण्यात आली आहेत. चंदनासोबत इतर ही अनेक झाडे तोडण्यात आली असून याला महापालिका अथवा वन विभागाची कोणतीही परवानगी नसल्याची माहिती मिळाली आहे.
विश्रामगृहाच्या परिसरात शनिवारी चित्र पाहिलं असता स्वछता गृहाच्या बाजूची 6 झाडे तोडण्यात आली आहेत, तिथून पुढे असलेल्या कचरा कुंडीत चंदनाच्या झाडांच्या फांद्या कचऱ्यात टाकल्याचे पहायला मिळाले. रेस्ट हाऊस मधील एक नंबर रूम समोर मोठे चंदनाचे झाड तोडण्यात आले असून झाड तोडल्याचे त्याच्या खोडा वरून सहज दिसत आहे.
शासकीय रेस्ट हाऊस मधील विशेष करून चंदनाची झाडे तोडली जात असतील तर कनिष्ठ अभियंता लेंगरे, सहाय्यक अभियंता लोखंडे , उपअभियंता जेऊरकर, कार्यकारी अभियंता ठाकरे हे काय करतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याची जबाबदारी यापैकी कुणावर घालायची असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
झाडे तोडणारे कर्मचारी ठेकेदार कुणीतरी ‘कुलाल’ ची माणसे होते. जर या’कुलाल नी कुणाचीही परवानगी न घेता झाडे तोडली असतील तर तेही कारवाईस पात्र आहेत.
चंदनाचे तोडलेले झाडे गायब झालेले असून त्याची किती रक्कमेला विक्री केली याची चौकशी होणे गरजेचे आहे. आठ दिवसापूर्वीच कार्यकारी अभियंता ठाकरे यांच्या बंगल्यातील ही चंदनाचे झाडे तोडल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणाची चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.


















