सोलापूर – जुगार खेळण्यासाठी पैसे दिले नसल्याच्या कारणावरुन जन्मदात्री आई वंदना हिच्या डोक्यात लोखंडी फुकारीने मारुन खुन केल्या प्रकरणी मुलगा अतुल एकनाथ कोळेकर, वय- ३० वर्षे, रा. मित्र नगर, शेळगी यास येथील तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश मिलींद ए. भोसले यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली..
यात हकीकत अशी की, आरोपी अतुल व त्याची आई वंदना हे मित्र नगर, शेळगी येथील स्वतः च्या घरी रहाण्यास होते. आरोपी अतुल यास जुगार खेळण्याचा नाद होता. जुगार खेळण्यासाठी पैसे दे म्हणून तो नेहमी आईशी भांडण तंटा करीत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पत्नी राधा घर सोडून निघून गेली होती. दि. २२/०८/२०२१ रोजीचे रात्री १० वाच्या सुमारास आरोपी हा त्याची आई वंदनाशी भांडत असल्याचा आवाज त्यांचा भाडेकरु राजकुमार कलावंत यांनी ऐकला. त्यावेळी आरोपी अतुलचे भांडण नेहमीचेच असल्याने त्याकडे दुर्लक्ष केला. तथापी पहाटे १.३० वा. च्या सुमारास मयत वंदना हिचा “भाउ भाउ” असा ओरडण्याचा आवाज ऐकून फिर्यादी राजकुमार कलावंत हा आरोपीच्या घरात जावून पाहिले असता, अतुल हा त्याची आई वंदना हिचे डोक्यात लोखंडी फुकारीने मारहाण करीत होता. त्यावेळी भरपूर रक्तस्त्राव झाला होता. राजकुमार कलावंत यांनी आरोपीस तु आईस का मारहाण करतो असे विचारले असता “तु मध्ये पडू नको, नाहीतर तुलाही मारीन म्हणून दम दिला. त्यामुळे घाबरुन राजकुमार कलावंत आपल्या घरात गेला असता आरोपी राजकुमार कलावंत याच्या घराच्या दरवाजाचा बाहेरील कडी लावला. दरम्यान आरोपीच्या घरासमोर रहाणारे नागुबाई बंडगर यांनी आरोपी यास लोखंडी फुकारी घेवून घरात आतबाहेर करत असल्याचे पाहून तिचा भाउ संतोष धायगुडे यास फोन करुन सांगितले. लागलीच संतोष धायगुडे यांनी त्या ठिकाणी येवून राजकुमार कलावंत याच्या घराच्या दरवाज्याची बाहेरील कडी काढली. त्यांनी मिळून वंदनाच्या घरात जावून पाहिले असता वंदना ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. याबाबत राजकुमार कलावंत याने जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली. त्यावरुन आरोपीविरुध्द भा.द.वि. कलम ३०२, ३४२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक भालचिम यांनी गुन्हयाचा तपास करुन मा न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र पाठविले.
या खटल्यात सरकारपक्षाने एकूण ०७ साक्षीदार तपासले. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादी कलावंत, नागोबाई बंडगर, संतोष धायगुडे, वैदयकीय अधिकारी डॉ. रिझवान कमले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. आरोपींनी त्याच्या बचावामध्ये तो मनोरुग्न असल्याने त्यास त्याचा फायदा मिळावा असा बचाव केला. तथापी सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील अॅङ गंगाधर रामपुरे यांनी आरोपीनेच घरामध्ये त्याच्या आईचा लोखंडी फुकारीने अनेक वार करुन तिचा चेहरा
चेंदामेंदा केला आहे. सरकारपक्षाने तपासलेले साक्षीदार विश्वासार्ह आहेत. शिवाय घटनेच्या वेळी आरोपी मनोरुग्न असल्याबाबतचा पुरावा आरोपींनी दिला नाही. त्यामुळे त्यास त्याचा फायदा देता येणार नाही असा युक्तीवाद केला. सदर युक्तीवाद व सरकारपक्षाने दिलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राहय आरोपी अतुलनेच त्याची आई वंदनाचा खुन केल्याबददलचा गुन्हा शाबीत झाल्याने जन्मठेपेची व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यास धमकावून त्याला त्याच्या दरवाज्याला बाहेरुन कडी लावून कोंडल्याबददल एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.
याकामी सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील अॅङ गंगाधर रामपुरे तर आरोपीतर्फे अॅङ सुरेश चव्हाण यांनी काम पाहिले. पो. कॉ. रफिक तांबोळी कोर्ट पैरवी होते.

















