सोलापूर : सोलापूर शहराची एक राजकीय महत्त्वाची बातमी समोर येत असून काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षपदी धनगर समाजाचे नेते आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे चेतन नरोटे यांची निवड निश्चित झाली आहे. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते नरोटे हे शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र घेणार असल्याची माहिती त्यांच्याकडूनच मिळाली.
मागील अनेक दिवसांपासून शहराध्यक्ष पदासाठी चेतन नरोटे यांचे नाव येत होते मात्र निवड काही झाली नाही. दोन दिवसांपूर्वी शहराध्यक्ष प्रकाश वाले हे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या सोबत होते तेव्हा त्यांनी वाले यांना तुमचे पाच वर्षे झाली आहेत राजीनामा द्या असे सांगितले तेव्हा वाले यांनी कोणताही विचार न करता 5 डिसेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या हातात दिला तसेच एक राजीनामा पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या टेबलावर ठेवले त्यानंतर एक पत्र प्रदेशला पाठविले. त्यामुळे आता चेतन नरोटे यांचा शहराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार प्रणिती शिंदे यांचा 9 डिसेंबर रोजी वाढदिवस असून नरोटे यांना ताईंच्या वाढदिनीच भेट मिळणार आहे. चेतन नरोटे हे सध्या तिरुपतीमध्ये असून ते बेंगलोरला जाऊन तिथून विमानाने मुंबईला जाणार आहेत आणि मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र स्वीकारणार असल्याचे खुद्द नरोटे यांनी सिंहासनशी बोलताना सांगितले.
काँग्रेस पक्षातून महेश कोठे हे बाहेर पडल्यानंतर चेतन नरोटे शिंदे कुटुंबियांच्या अत्यंत जवळ गेले, तेव्हापासून ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे जेव्हा सोलापूर येत असतात त्यांच्यासोबत नरोटे हे कायम दिसून आले. काँग्रेसमध्ये आक्रमक नेता म्हणून चेतन नरोटे यांच्याकडे पाहिले जाते. महापालिकेच्या राजकारणाचा मोठा अनुभव आणि अभ्यास नरोटे यांच्याकडे असल्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शहराध्यक्ष म्हणून नरोटे यांची भूमिका निश्चितच महत्त्वाची असणार यात कोणतीही शंका नाही.



















