सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप इथल्या प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करत सातबारा उताऱ्यावर लागलेली एमआयडीसीची नोंद कमी करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंद्रूप ते मुंबई असा बैलगाडी मोर्चा काढला आहे.
या मोर्चाची माहिती मिळताच उद्योग मंत्रालयाने मंद्रूप औद्योगिक क्षेत्राच्या विना अधिसूचनेचा प्रस्ताव पुढील पंधरा दिवसात उच्चाधिकार समितीच्या बैठकीसमोर सादर करून प्रस्तुत विषय मार्गी लावण्यात येईल असे पत्र मोर्चाचे नेतृत्व करणारे महादेव कुंभार यांना देण्यात आले आहे. तरीही शेतकरी सातबारा उताऱ्यावरील एमआयडीसीची नोंद कमी करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.
या शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला असता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली, उद्योग मंत्रालयाचे पत्र दिले मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.
दरम्यान दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. या दोन दिवसात निर्णय न झाल्यास हा मोर्चा पुन्हा मुंबईकडे मार्गस्थ होईल असा निर्णय झाला आहे.

















