सोलापूर : नवनीत हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार न करता वडिलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली सोलापुरातील नामांकित डॉक्टर नितीन तोष्णीवाल यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर हिंदुराव अडसुळ, वय ३२ वर्षे, रा. मु.पो. सुस्ते, ता. पंढरपुर, जि. सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ नितीन तोष्णीवाल यांच्यावर भादविक 304 अ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अडसूळ यांनी तब्बल सहा महिन्यांनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. दिनांक 15 जानेवारी 2022 ते 18 जानेवारी 2022 दरम्यान हिंदुराव अडसूळ हे नवनीत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते.
फिर्यादीचे वडील हिंदुराव अडसूळ हे घरी असताना त्यांना चक्कर येवून त्रास होत असल्याने गावाकडील डॉ. सालविठ्ठल यांचेकडे प्राथमिक उपचार घेतला व त्यांचे सांगणेवरुन तसेच डॉ. तोष्णीवाल यांना फोन करुन माहिती दिल्यानंतर फिर्यादीने त्यांचे वडीलांना नवनीत हॉस्पीटल येथे पुढील उपचारास दाखल केले. त्यानंतर फिर्यादीच्या वडीलांना आयसीयू मध्ये भरती केले असता, फिर्यादीस त्यांचे वडीलांना भेटयास देण्यात आले नाही. तसेच डॉ. संग्राम यांनी फिर्यादीस बोलावून घेवून सांगितले की, पेशंट फार सिरीयस आहे त्यांना डायलेसीसची गरज आहे असे सांगितल्यानंतर डॉ. राठोड व डॉ. पैकी यांनी फिर्यादीस सांगितले की पेशंटचे किडणीचे क्रिएटीन वाढले आहे त्यामुळे लंग्स व हृदयावर दाब वाढत आहे त्यांना डायलेसीस करणेस सुरुवात करीत आहोत.
त्यानुसार डॉक्टरांनी डायलेसीस सुरु केले. त्यावेळी देखील डॉ. तोष्णीवाल आले नाही पुन्हा फिर्यादीस बोलावून डॉक्टरांनी सांगितले की डायलेसीस प्रक्रिया पुर्ण झाली असून क्रिएटीन कमी झाले आहे थोडा वेळ वाट पाहू पुन्हा डायलेसीस करु असे सांगितले. तरी परंतु पेशंट गंभीर आहे असे सांगितले. त्यानंतर डायलेसीसची प्रक्रिया सुरु करताना फिर्यादीस बोलावून स्क्रिनवर फिर्यादीचे वडील अतिशय सिरीयस असून पंपींग करणे सुरु असल्याचे दाखविले. त्यात फिर्यादीचे वडील हे मयत झाले आहेत. त्यानंतर फिर्यादीने हॉस्पीटलचा बिल भरणा करुन फिर्यादीचे वडील नामे हिंदुराव गोवर्धन अडसुळ यांच्यावर करण्यात आलेले उपचार वेळेवर न करण्यात आल्याचे व पुर्णपणे आजारास अनुसरुन न केल्याचे फिर्यादीच्या वडीलांचे मृत्यूस डॉ. नितीन तोष्णीवाल यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याने मयत झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.


















