पंढरपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचा एल्गार पुकारला. 3 मे रोजी मुस्लिम समाजाचा रमजान ईदचा सण साजरा झाल्यानंतर 4 मे पर्यंत भोंगे न निघाल्यास मनसे कार्यकर्ते ते भोंगे काढतील अथवा मशिदी समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा पठण करतील असा इशारा त्यांनी औरंगाबादच्या सभेत दिला होता.
या पार्श्वभूमीवर राज्यात मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी कलम 149 नुसार नोटीस देण्यात आल्या आहेत. मनसे नेते दिलीप धोत्रे यांना देखील पंढरपूर शहर पोलिसांनी नोटीस दिली आहे. त्यांच्यासोबत अनेक मनसैनिकांना देखील ही नोटीस बजावण्यात आली आहे.
मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यावर पोलिसांची करडी नजर आहे. त्यांनी आपल्या मनसैनिकांसह गनिमिकाव्याने भोंगे काढण्याचा अथवा मशिदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करू नये यासाठी अप्रत्यक्षरित्या त्यांना नजरकैदेत ठेवले असल्याचे दिसत आहे.
धोत्रेंच्या निवासस्थाना समोर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.


















