सोलापूर : येथील स्वातंत्र्यसैनिक नगर मध्ये राहणाऱ्या नंदकुमार दयानंद कट्टे यांचे चिरंजीव प्रांजल नंदकुमार कट्टे याने जे.ई.ई. ॲडव्हान्स परीक्षेत भारतात ६५३ वा रँक मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. ओबीसी प्रवर्गामध्ये त्याचा ८२ वा रँक आला आहे.
ओबीसी प्रवर्गातून सोलापूर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला प्राजंल सर्वसाधारण गटात जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. यापूर्वी जे.ई. ई. मेन्स मध्ये त्याचा १७२३ रँक होता. इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण सेंट थॉमस स्कूलमध्ये घेतलेल्या प्रांजलने नंतर बाकलीवाल क्लासेस मध्ये शिक्षण घेतले. प्रांजलच्या या यशासाठी आई-वडिलांबरोबरच त्याच्या शिक्षकांचे व शिक्षिका असलेल्या आत्या सौ. शर्मिष्ठा कवदे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.
प्रांजल बालपणापासूनच गुणवंत असून त्याच्यामध्ये अभ्यासाची गोडी आहे. त्याचा स्वअध्याय सुद्धा या यशामध्ये तितकाच महत्त्वाचा ठरला असे मत स्वतःचा डिप्लोमा झाल्यानंतर घरचा ऑटोमोबाईल्स स्पेअर पार्टचा व्यवसाय सांभाळणारे प्रांजलचे वडील नंदकुमार कट्टे यांनी व्यक्त केले.
गेल्या दोन दिवसात नातेवाईकांकडून, शिक्षकांकडून आणि समाजातील विविध मान्यवरांकडून प्रांजलचे कौतुक होत आहे. आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून कॉम्प्युटर सायन्स मध्ये करिअर करण्याचे ध्येय असल्याचे यावेळी प्रांजल कट्टे याने सांगितले.



















