सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेमध्ये सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट सचिन देशमुख यांनी पंढरपूर हा स्वतंत्र जिल्हा करावा असा ठराव मांडला त्या ठरावाला माढ्याचे भारत आबा शिंदे व पंढरपूरचे सदस्य वसंत नाना देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत चेष्टा मस्करीत हा ठराव मंजूर करण्यात आला, या ठरावाचे गांभीर्य दुसऱ्या दिवशी सर्वांच्या लक्षात आलं हा ठराव नव्हता तर सोलापूर जिल्हा तोडण्याचा विषय होता,
नंतर या ठरावाला अनेकांनी विरोध केला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे मोहिते-पाटील गटाचे असल्याने त्यांना पंढरपूर स्वतंत्र जिल्हा ही भूमिका मान्य नाही अशी चर्चा आहे, त्यामुळे अध्यक्ष कांबळे यांच्यावर राजकीय दबाव आला तेव्हापासून तो विषय शांत होता मात्र एडवोकेट सचिन देशमुख हे अध्यक्ष कांबळे यांच्या ठरावावर सही साठी प्रयत्नशील आहेत, त्यावेळी सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या ठरावावर तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी सही करून तो ठराव अध्यक्ष कांबळे यांच्याकडे पाठवला आहे अशी माहिती मिळाली मात्र जिल्हा परिषद अध्यक्ष कांबळे हे या ठरावावर सही करण्यास इच्छुक नाहीत. दरम्यान मंगळवारी काही पत्रकारांनी कांबळे यांच्यासमोर हा विषय काढला असता मी कदापिही या ठरावावर सही करणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली कारण विचारले असता सोलापूरला वेगळे करण्याची भूमिका मला मान्य नाही आणि पंढरपूर स्वतंत्र जिल्हा करण्याची गरज नाही असे ते म्हणाले.
पंढरपूर स्वतंत्र जिल्हा करायचा झाल्यास त्याला बारामती जोडला जाईल आणि हे सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना मान्य नाही त्यामुळे या मागणीला सोलापूरातून तीव्र विरोध आहे. आता सचिन देशमुख हे काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणारे आहे.


















