सोलापूर : सोलापूरच्या काँग्रेसमध्ये सध्या नाराजांची संख्या वाढली आहे, त्याला कारणे ही अनेक दिसून येतात, एकीकडे पक्ष आणि नेते अडचणींना तोंड देत असताना कार्यकर्ते मात्र पक्ष सोडताना दिसत आहेत. माजी खासदार धर्मांण्णा साधूल यांनी काँग्रेस पक्ष सोडला त्यानंतर मोची समाजातील माजी महापौर संजय हेमगड्डी यांचीही नाराजी दिसून येत आहे.
त्याचबरोबर मुस्लिम समाजातील कार्यक्षम नगरसेविका म्हणून ओळख असणाऱ्या फिरदोस पटेल या सुद्धा पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांची नाराजी बराच वेळा दिसून आली पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात त्या सक्रिय दिसत नाहीत.
सध्या रमजान महिना सुरू असल्याने शौकत पठाण यांनी इम्पेरियल गार्डनमध्ये रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते त्या इफ्तार पार्टीला काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गर्दी सर्वाधिक होती. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये गेलेले आणि कार्यकर्ते ज्यांना ‘बॉस’ म्हणतात त्या सुधीर खरटमल यांना या इफ्तार पार्टीमध्ये महत्त्व देण्यात आल्याचे पाहायला मिळालं. पठाण यांनी त्यांचे जंगी स्वागत केले, आपल्या खुर्चीवर त्यांना बसवले. त्यांच्याच बाजूला काँग्रेसवर नाराज असणारे संजय हेमगड्डी होते.
सर्वाधिक ऑनलाईन मतदार नोंदणी झाल्याबद्दल खुद्द राहुल गांधी यांनी माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांच कौतुक केले होते त्याच पटेल यांचे आता काँग्रेसची कुठे पटेनासे झाले असा प्रश्न आता पडतोय. महिला शहराध्यक्षपदी फिरदोस पटेल इच्छुक होत्या, मात्र अजूनही शहराध्यक्ष पद बदलले गेले नाही. त्यामागील हे तर कारण नसावे अशीही शक्यता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

















