सोलापूर तालुका पोलीस ठाणे हददीतील सराईत गुन्हेगार विजय उर्फ आण्णा सुभाष कोरे याच्यावर MPDA कायद्याअंतर्गत कारवाई करून येरवाडा कारगृह येथे हळवण्यात आले.
विजय उर्फ अण्णा सुभाष कोरे, वय 42 वर्षे, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर हा शरिराविषयक व मालाविषयक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असून मागील पाच वर्षात दखलपात्र स्वरूपाचे 08 व अदखलपात्र स्वरूपाचे 05 असे गुन्हे दाखल होते. तो मागील अनेक वर्षांपासून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी व त्याची दहशत व भिती राहावी याकरीता नागरीकांशी गुन्हेगारी वर्तन करत होता.
त्याच्या विरूध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे तसेच सदरबझार पोलीस ठाणे येथे धार्मिक भावना दुखवून दोन समाजात तेढ निर्माण करणे, जबरीने मालमत्ता घेणेकरीता इच्छापुर्वक दुखापत करणे, लोकांची फसवणुक करणे, महिलांची छेडछाड करणे, दगड फेकुन मारणे, रस्ता अडवुन वाहनाचे नुकसान करणे, मारहाण करणे, षिवीगाळी व दमदाटी करणे, न्यायालयीन कर्मचारी (बेलीफ) यांना शिवीगाळी दमदाटी करून धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशा प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य करुन विजय कोरे याने परिसरात दहशत व भिती निर्माण केली होती.
तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण केली आहे. अशा प्रकारे त्याने परिसरात दहशत निर्माण करुन स्वतःस धोकादायक इसम म्हणून सिध्द केले होते.
विजय कोरे याच्यावर यापुर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली होती.तरीसुध्दा त्याचे वर्तनात काही एक फरक पडला नसल्याने सत्य साई कार्तीक (भा.पो.से.),तत्कालीन प्रभारी अधिकारी, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी MPDA अंतर्गत स्थानबध्द करणेबाबत पोलीस अधीक्षक, यांचे मार्फतीने जिल्हादंडाधीकारी, सोलापूर यांचेकडे प्रस्ताव सादर केला होता.
जिल्हादंडाधीकारी सोलापूर यांनी गुन्हेगार विजय उर्फ आण्णा कोरे याचे गुन्हेगारी कारवायांवर वेळीच प्रतिबंध करण्यासाठी MPDA अधिनियम, १९८१ अन्वये स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित केल्याने त्यास दिनांक 06/08/2022 रोजी ताब्यात घेवून त्याला मध्यवर्ती कारागृह, येरवडा पुणे येथे जमा करण्यात आले आहे.



















