सोलापूर : जिल्ह्यातील काँग्रेसला धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपात डॅशिंग अध्यक्ष लाभला. मागील 5 वर्षे पाणीवच्या प्रकाश पाटलांनी नावालाच अध्यक्ष पद सांभाळले होते. त्यामुळे जिल्हा काँग्रेसला घरघर लागल्याचे चित्र होते. सुरेश हसापुरे अध्यक्ष होणार अशी चर्चा असतानाच कुणाला अपेक्षित नसलेले अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.
मोहिते पाटलांनी सुरुवात तर दणकून केली. तालुकानिहाय बैठका घेतल्या, कार्यकर्त्यांची मत जाणून घेतली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय दौरे घेऊन बैठका घेतल्या. काँग्रेसने वातावरण ढवळून सोडले. जिल्ह्यात चर्चा होऊ लागली. राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वतःहून आघाडीची भाषा पुढे आली.
नवीन पदाधिकारी नियुक्त झाले. मात्र त्यामध्ये भविष्यात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ लक्षात घेऊन पद दिली गेली, त्याची बरीच चर्चा झाली, काही प्रमुख नेत्यांना जाणीवपूर्वक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न त्या निवडीत झाला. त्यानंतर जिल्हाध्यक्ष गायब झाले ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यात दिसले, नंतर परत काही महिन्यांनी सोनम पटेल यांच्या दौऱ्यात दिसले.
आता तर बरेच दिवस झाले त्यांचे दर्शन काँग्रेस भवनात झाले नाही. जिल्ह्याचे कार्यालय म्हणजे काही ठराविक कार्यकर्त्यांची बैठकीचा ठिय्या झाल्याचं चित्र आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. येत्या 28 जुलै रोजी आरक्षण काढले जाणार आहे. झेडपी व पंचायत समिती निवडणुकीत स्वबळाची भाषा करणारे धवलदादा कुठे आहेत असा प्रश्न काँग्रेस भवन विचारत आहे.
आता तर रामाने ही सिंहाची साथ सोडल्याचं पहायला मिळतंय. राम म्हणजे माजी आमदार रामहरी रुपनवर. विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर सहा वर्षात सहा वेळा सुद्धा काँग्रेस भवनात न आलेले रुपनवर अप्पा धवलसिंह हे अध्यक्ष झाल्यानंतर ते पदभार घेताना, प्रत्येक तालुक्याच्या बैठका घेताना, रोजच सोबत यायचे. त्यामुळे अध्यक्षांना एका ज्येष्ठ नेत्याचे चांगले मार्गदर्शन मिळत होते.
परंतु आता ते ही सोबत दिसत नाहीत. राज्यात सत्ता गेल्याने पुन्हा पक्षात मरगळ आल्याचे चित्र आहे. जिल्हाध्यक्षांनी ही मरगळ घालवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, निवडणुका असल्याने आता पुन्हा सक्रिय होणे पक्षाची गरज बनली आहे.




















