सोलापूर शहरात गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान नई जिंदगी मजरेवाडी परिसरात असलेल्या प्रभाकर नगर या ठिकाणी लहान लेकरं घराबाहेर खेळत असताना त्यातील दोघांचा खेळता खेळता विजेच्या खांबाला स्पर्श होऊन करंट बसला.
त्यापैकी एका मुलाला करंट लागल्याने तो ओरडत घराकडे पळाला तर दुसरी एक सात वर्षाची ऐमन बिराजदार नावाच्या मुलीचा विजेच्या जोराच्या धक्क्यामुळे जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्वरित आसपासच्या लोकांनी या मुलीला सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्या मुलीला मृत घोषित केले.
सध्या नातेवाईकांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी केली असून आपल्या पोटच्या सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याने वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. याबाबत सिव्हिल चौकीत नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुन्हा एकदा सोलापूर शहरात विजेच्या पोलमुळे चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सोलापुरात याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत परंतु प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.



















