सांगोला : ह. भ. प. शारदादेवी साळुंखे पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या ८३ व्या वर्षी सांगोल्यात रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.
उद्या रविवारी (दि. ४ ) सकाळी ९ ते ११ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी ११ ला अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारी १.०० वाजता त्यांच्या पार्थिवावर जवळा येथील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
सांगोला तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. पती स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व मुलगा माजी आमदार दिपकआबा साळुंखे – पाटील यांच्या रूपाने शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याला दोन आमदार व कन्या जयमालाताई गायकवाड यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले.
त्यांच्या पश्चात पुत्र दिपकआबा व डॉ. प्रदीपदादा ही दोन मुले व जयमाला गायकवाड व चारुशीला काटकर अशा दोन मुली तर सौ. रुपमती दिपक साळुंखे व सौ. मधुमती प्रदीप साळुंखे या दोन सुना तर डॉ. पियुष साळुंखे, यशराजे साळुंखे, प्रियांका साळुंखे- देशमुख, मुक्ता साळुंखे-गायकवाड, कु. कृष्णाई साळुंखे, डॉ.निलेश काटकर, आरती काटकर-घाडगे, विक्रम गायकवाड, नेहा गायकवाड-आमरे आदी नातवंडे असा परिवार आहे.
महिनाभरापासून सांगोला येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तब्बल महिनाभर तज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही वाढत्या वयामुळे ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या शरीराने उपचारास साथ न दिल्याने अखेर आज शनिवारी रात्री निधन झाले.


















