सोलापूर : जिल्हा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश हसापुरे यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील 53 विविध कार्यकारी सेवा सोसायटी नुतन संचालकांचा सत्कार तसेच हसापुरे यांचा नागरी सत्काराचे आयोजन टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे होते. करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांच्या हस्ते यावेळी सोसायटीचे नूतन संचालक आणि हसापुरे यांचा सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर सुरेश हसापुरे गौरव समितीचे अध्यक्ष हरीश पाटील यांच्यासह सुरेश हसापुरे यांना पडत्या काळात मतदान करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक करणाऱ्या दक्षिण तालुक्यातील 11 ज्येष्ठ मान्यवरांची उपस्थिती होती.
सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, आयुष्यात संघर्ष करून पुढे आलेलं नेतृत्व आहे,जिल्ह्याच्या प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून समीकरणे जुळवण्यात माहीर तर जिल्ह्यात किंगमेकर म्हणून ओळख आहे, दक्षिण तालुक्याचे नेते स्वर्गीय शिवदारे अण्णा व दुधनी अण्णा यांनी नेतृत्व गुणांचे कौतुक केले, जिल्हा बँक व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमचा पाठिंबा आहे म्हणूनच सुरेश हसापुरे यांच्यात दक्षिण तालुक्याचं नेतृत्व करण्याची धमक असल्याने भविष्यात ते आमदार होतील अशा शुभेच्छा दिल्या.
आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, सुरेश हसापुरे म्हणजे जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीत सर्वपक्षीय दुवा म्हणून ओळखला जातो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांनी मोठी झेप घेतली आहे. जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील, स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक, दिलीप सोपल, बबनराव शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, स्वर्गीय गणपतराव देशमुख अशा ज्येष्ठ नेत्यांसोबत काम करण्याची संधी हसापुरे यांना मिळाली आहे. असेच काम करत रहा आम्ही कायम तुमच्या पाठीशी राहू.
विजयराज डोंगरे म्हणाले, सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सुरेश हसापुरे हे काम करतात. राजकीय पार्श्वभूमी नसताना संघर्षातून त्यांनी प्रगती केली आहे. जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून त्यांची ओळख असून आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक चढउतार पाहिले आहेत. जिल्हा बँक, बाजार समिती, जिल्हा परिषदेमध्ये यांचे काम कायमच उल्लेखनीय राहिले. यापुढेही मित्र म्हणून मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे. म्हेत्रे यांनी सहकार्य केल्यास हसापुरे दक्षिणचे आमदार होतील.
सत्कारमूर्ती सुरेश हसापुरे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला, यंदा कोणते पद नसताना,तालुक्यात 55 पेक्षा अधिक सोसायट्या ताब्यात आल्या, त्या सोसायट्यांमधील विजय झालेल्या सभासदांचा तसेच जेष्ठ नागरिकांचा सत्कार आणि संचालक महिला भगिनींचा साडीचोळी देऊन आहेर करण्याचा कार्यक्रम आखल्याचे स्पष्ट केले.
तत्पूर्वी कार्यक्रमाचे गौरव समितीचे स्वागताध्यक्ष तथा संदरगी गावाचे उपसरपंच पद्मसिंह शिवशेट्टी पाटील यांनी प्रास्ताविकातून हसापुरे यांच्या कार्यपद्धतीचा नामोल्लेख करत सामान्य कार्यकर्त्याला जापणारा माणूस असल्याचे सांगितले.
दरम्यान सकाळपासूनच सुरेश हसापुरे मित्र परिवारांची टाकळीकर मंगल कार्यालयमध्ये सुरेश हसापुरे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. हलगीच्या निनादात तसेच फटाक्यांच्या अतिषबाजीमध्ये मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यकर्ते व समर्थकांची एवढी गर्दी होती की, टाकळीकर मंगल कार्यालय भरून बाहेर थांबून शेकडोंनी कार्यक्रम पाहिला.



















