सोलापूर : एमआयएमचे नेते तौफिक शेख यांनी रिपाई नेते प्रमोद गायकवाड आणि माजी सहा नगरसेवकांसह शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात तौफिक शेख यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
तौफिक शेख हे शब्दाचे पक्के नेते आहेत. मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो. राज्यातील आमची सत्ता गेली, त्यामुळे प्रवेश होणार की नाही? याबाबत मला शंका होती मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला. त्यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर आणि आजूबाजूच्या चार तालुक्यांमध्ये पक्षाची ताकद वाढणार हे नक्की आहे. आजकाल नेते केवळ सत्तेच्या सभोवताली रेंगाळत आहेत.
सत्ता येते जाते, गेलेली सत्ता शरद पवार यांनी राज्यात अनेक वेळा आणून दाखवली आहे. शब्दाच्या पक्क्या कार्यकर्त्याला शरद पवार हे कधीच विसरत नाहीत. महाराष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाला ताकद देण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. तौफिक शेख हे भाषण करताना मी ऐकत होतो ते काँग्रेस पक्षात असताना त्यांना काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली, एमआयएममध्ये गेले.
पक्षाची ताकद वाढवली मात्र एमआयएमचा वापर कसा होतो हे त्यांना कळाले. देशात एमआयएम पक्षाची प्रतिमा कशी आहे हे आता सर्वांना माहीत झाले आहे त्यामुळेच तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला असल्याचे जयंत पाटील म्हणाले.



















