सोलापूर : जिल्हा परिषद समाज कल्याण मधील दलित वस्तीच्या कामांत आमदारांचा हस्तक्षेप नको, वंचित दलित वस्तीच्या कामांना प्रथम प्राधान्य द्यावे त्यानंतर इतर कामे मंजूर करावीत, जलजीवन योजनेच्या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्ष सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे दलित वस्तीच्या कामात तोडगा नाही निघाला तर जिल्हा परिषदेला कुलूप घालण्याचा इशारा नेते बाबा कारंडे यांनी दिला.
15 दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे 45 सरपंच जिल्हा परिषदेमध्ये आले होते त्यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांची भेट घेत त्या ठिकाणी ठिय्या मांडला होता. दलित वस्तीची कामे आणि आमदारांचा काय संबंध ग्रामपंचायतने दलित वस्तीच्या कामासंदर्भात केलेला ठराव ग्राह्य का धरला जात नाही असा प्रश्न उपस्थित करत सरपंचांची यादी ग्राह्य धरावी अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी ठोस निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान या पंधरा दिवसात कोणताही निर्णय न झाल्याने शेकापने अखेर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू केले आहे.
चंद्रकांत देशमुख, डॉ बाबासाहेब देशमुख, बाबा कारंडे, दादासाहेब बाबर, संगम धांडोरे, संतोष पाटील, संतोष देवकते, बाळासाहेब काटकर, कल्याण लुबाळ, राजेंद्र देशमुख, संजीवनी लुबाळ, शाहजी गडहिरे, जयंत बाबर, ऋषिकेश शेटे, शरद हिप्परकर, गजेंद्र कोळेकर, दीपक गोडसे यांच्यासह सरपंच मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना वंचित वस्तींना प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगत याप्रकरणी समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती दिली होती आता या आंदोलनानंतर कोहिनकर हे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


















