सोलापूर : सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत शपथविधीनंतर पहिल्यांदा सोलापूर शहरात येत असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नियोजित वेळेपेक्षा तब्बल अडीच तास उशिराने मंत्री महोदय पुणे नाक्यावर पोहोचले. नियोजित वेळेच्या आधीपासून पुणे नाक्यावर वाद्यवृंद आणि शिवसैनिकांनी गर्दी केली होती. हलगी, ताशा ढोलाच्या गजराने पुणे नाका परिसर दणाणून गेला होता.
दीडशे किलो वजनाच्या पुष्पहराने स्वागत करण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून क्रेन सज्ज होते. रात्री साडे आठ वाजता मंत्री तानाजी सावंत यांचे आगमन झाले प्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याठिकाणी पदाधिकाऱ्यांनी 150 किलोचा क्रेनने हार घालून सत्कार केला.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहर अर्पण करून चार हुतात्मा पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, जिल्हाप्रमुख मनीष काळजे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, शहरप्रमुख मनोज शेजवाळ, अनिकेत पिसे, संकेत पिसे, माजी नगरसेवक उमेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
हरिभाऊ चौगुले यांचे शक्ती प्रदर्शन
उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे जंगी स्वागत केले. माजी नगरसेविका अंजली चौगुले यांनी तानाजी सावंत यांचे औक्षण केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
…


















