सोलापूर शहरातील होटेल ढाब्यांवर बसून दारु पिणा-यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच असून सोमवारी रात्रीच्या सुमारास शहरातील अक्कलकोट रोडवरील होटेल गॅलेक्सी या ठिकाणी धाड टाकून ढाबा चालकासह त्या ठिकाणी दारु पितांना आढळून आलेल्या 4 मद्यपी ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 12 डिसेंबर सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ यांच्या पथकाने अक्कलकोट रोडवरील गांधीनगर परिसरातील होटेल गॅलेक्सी बिर्याणी हाऊस मध्ये धाड टाकून होटेल चालक दिनेश राजू चव्हाण, वय 27 वर्षे, रा. गांधीनगर याच्यासह मद्यपी ग्राहक प्रशांत वेमन्ना चितांकिदी, दरेप्पा अशोक गिराम, विट्ठल कल्याणप्पा हडपद व बागेश गुरुशांत जोलद यांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 3 बाटल्या व बडवायझर स्ट्रॊंग बिअरच्या 650 मिली क्षमतेच्या 2 बाटल्या व 10 प्लास्टीक ग्लास असा एकूण एक हजार एकशे अंशी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 68 (अ) (ब) व 84 नुसार गुन्हा दाखल करुन गुन्हयाचे तपास अधिकारी यांनी 13 डिसेंबर रोजी एक दिवसात गुन्ह्याचे आरोपपत्र मा. न्यायालयात दाखल केले असता श्रीमती नम्रता बिरादार, न्यायदंडाधिकारी दारुबंदी न्यायालय,सोलापूर यांनी तात्काळ निकाल देत ढाबाचालकाला रू. 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रू. दोन हजार असा एकूण तेहतीस हजारांचा दंड ठोठावला आहे.
ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संभाजी फडतरे, सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, पुष्पराज देशमुख, सहायक दुय्यम निरिक्षक सिद्धराम बिराजदार, जवान प्रियंका कुटे, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
*आवाहन*
ग्रामपंचायत निवडणूक, नाताळ सण व नविन वर्षाच्या पार्श्वभूमीवर या विभागाकडून ढाबा / होटेलच्या तपासण्या करण्यात येत असून ढाब्यांवर दारु विक्री करणे तसेच त्याठिकाणी बसून दारु पिणे हे कायद्याने गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक कारवाया केल्या जातील. *ज्या होटेल्सना न्यू ईअर पार्ट्यांचे आयोजन करावयाचे आहे त्यांनी त्याठिकाणी मद्याचे वितरण करण्यासाठी या विभागाकडून रीतसर वनडे क्लब लायसंस घ्यावे, अन्यथा अशा होटेल्सचे मालक व आयोजकांविरुद्धही कारवाई करण्यात येईल*-
नितिन धार्मिक, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर


















